वाराणसी : वृत्तसंस्था । काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी केवळ राजकारण करतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
हाथरस गँगरेप प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राजकीय व्यक्तींना परवानगी दिलेली नाही. महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी काहीच अवाक्षर न काढल्याने त्यांच्यावर विरोधी पक्ष टीका करत होते. यावर आता इराणी यांनी वाराणसीमध्ये पत्रकार परिषद घेतली. इराणी म्हणाल्या, घटनात्मक मर्यादेमुळे मी कोणत्याही राज्याच्या कार्यात हस्तक्षेप करत नाही. परंतु हासरस प्रकरणावरून मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याची संवाद साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. काल हाथरस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीचा अहवाल येऊ द्या. त्यानंतर, ज्यांनी हस्तक्षेप केला त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि योगी त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करतील अशी आशा स्मृती इराणी यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वधेरा यांनी गुरुवारी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरसकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथे ‘एक्स्प्रेस वे’वर त्यांच्या मोटारींचा ताफा अडविला. त्यानंतर त्यांनी १४० किलोमीटर अंतर पायी जाण्याचे ठरविले. ते कार्यकर्त्यांसह पायी निघाले असता एका पोलिस अधिकार्याने राहुल गांधी यांची कॉलर धरली. त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने यावेळी झटापट झाली. या गोंधळात राहुल गांधी रस्त्यावर पडले. राहुल आणि प्रियांका यांना पोलिसांनी अटकही केली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी महामार्गावरच आंदोलन सुरू केले. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला होता.