यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार १ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जितेंद्र उत्तम तायडे (वय-३८, रा. सांगवी बुद्रुक ता. यावल) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जितेंद्र तायडे हा तरुण आपल्या आईसह यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे वास्तव्याला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन होते. शिवाय त्याची पत्नी गेल्या काही वर्षांपासून विभक्त राहत आहे. दरम्यान १ जून रोजी सकाळी ७ वाजता त्याचा भाऊ हेमंत तायडे हा कामावर निघून गेला. त्यावेळी घरी जितेंद्र हा एकटा होता. दरम्यान त्याने राहत्या घरात छताला असलेल्या लाकडाला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी १२.३० वाजता उघडकीला आला. गावातील विकास सोनवणे यांनी फोन करून हेमंत तायडे याला घटनेची माहिती दिली. यावेळी गावात राहणारे प्रकाश तायडे, विक्रम तायडे, पंकज सोनवणे, आश्विन तायडे, विक्रम मेघे यांनी खाली उतरवून त्याला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी पंचनामा केला असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.