जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने मजुरांची संख्या रोडावली आहे.वरणगाव नजीकच्या उड्डाणपुलाचे कामाने मात्र गती घेतली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून मध्यंतरीच्या काळात कामाने जोरात गती घेतली होती. सर्वत्र काम सुरू होते, मात्र 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्याने बिहार, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील शेकडो मजूर आपल्या गावाकडे निघून गेले, त्यामुळे रस्त्याचे काम थांबले. गेल्या 20 दिवसांपासून मोजक्या मजुरांच्या उपस्थितीत उड्डाण पूल, मोऱ्याचे काम सुरू झाले असून कामाचा वेग मंदावल्याचे दृश्य दिसत आहे. नशिराबाद जवळील उड्डाण पूल, साकेगावजवळ वाघूर नदीवरील पुलाचे एका भागाचे काम पूर्णत्वास आले आहे. जुना पूल तोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ येथील नाहाटा कॉलेजसमोरही उड्डाण पुलाचे काम धीम्यागतीने सुरू आहे, तसेच वरणगाव रेल्वे गेटजवळील उड्डाण पुलाचे काम कमी मजुरांच्या उपस्थितीत सुरू आहे. मुक्ताईनगर येथेही उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहतुकीला काहीसा अडथळा ही निर्माण होत आहे.तर काही ठिकाणी रस्त्याच्या चौपदरीकरणचे काम सुरू आहे. रखडलेले काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
https://www.facebook.com/watch/?v=2669588116702086