जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह नव्याने उफाळून आले असून यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुखपदाचा वाद चिघळला आहे.
याबाबत वृत्तांत असा की, याआधी विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून राजेश पाटील काम पाहत होते. नामदेवराव चौधरी यांची महानगर अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून राजेश पाटील यांच्याऐवजी दुर्गेश पाटील यांची नियुक्ती केली आहे. याबाबत जिल्हा प्रभारी दिलीप वळसे-पाटील यांनी कार्यकारिणीला स्थगिती दिली होती. दरम्यान, ही स्थगिती उठवून प्रदेश नेत्यांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले. स्थानिक पातळीवर घटनाबाह्य निवड केल्याचा राजेश पाटील यांनी आरोप केला आहे.
शहर अध्यक्षांना विधानसभा क्षेत्रप्रमुख निवडण्याचा अधिकार नाही. हा अधिकार प्रदेश नेत्यांना आहे. असे असताना नामदेवराव चौधरी यांनी त्यांच्या अधिकारात घटनाबाह्य पद्धतीने विधानसभा क्षेत्रप्रमुखाची निवड केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन ही बाब लक्षात आणून देणार असल्याचे राजेश पाटील यांनी म्हटले आहे.