रावेर, प्रतिनिधी । चेक बांउन्सप्रकरणी येथील न्यायालयाने एका आरोपीस सश्रम कारावास व दीड लाखाचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास आणखी तीन महिन्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. ही शिक्षा न्यायमूर्ती आर.एल.राठोड यांनी सुनावली आहे.
याबाबत वृत्त असे की मुंदखेड (ता.जामनेर) येथील सुनील जोशी याने वादी सुशीला चौधरी यांना तडजोडीच्या वेळी काही रक्कम नगद दिली होती. तर बाकी रक्कमेबद्दल प्रत्येकी एक लाखाप्रमाणे सात चेक व एक चेक एक लाख तीस हजार रुपये किमतीचा दिला होता. सुशीला चौधरी यांनी जोशी यांच्याकडे वेळोवेळी रक्कमेची मागणी केली मात्र त्याने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यापैकी पहिला एक चेक १ लाख रुपयांचा अनादरप्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला आहे . सुनील जोशी याने त्यांच्या बचत खात्याच्या धनादेश देऊन सदर तडजोडीची रक्कम देण्याची हमी व खात्री दिली होती, मात्र सुनील जोशी याने त्यांच्या बचत खात्यामध्ये धनादेश दिलेली रक्कम शिल्लक न ठेवता अनादर केला म्हणून कलम १३८ प्रमाणे रावेर येथील न्यायालयात खटला दाखल होता.
त्या अनुषंगाने फौजदारी खटल्याच्या चौकशी अंती रावेर न्यायालयाचे न्यायमूर्ती आर . एल . राठोड यांनी दि ५ रोजी निर्णय देऊन आरोपी सुनील गजानन जोशी यास सश्रम कारावास तसेच दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव तीन महिने ज्यादाची शिक्षा दिली असुन दंडाची रक्कम १ लाख ४५ हजार रुपये वादी सुशीला चौधरी यांना देण्याचा देखील आदेश न्यायालयाने आदेश पारित केला आहे. न्यायालयाने प्रतिवादी सुनील गजानन जोशी यास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या खटलयात वादीकडून अॅड जगदीश महाजन, अॅड सलीम जामलकर, अमोल नाईक यांनी कोर्टाचे काम पाहिले. या निर्णयामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.