रावेर प्रतिनिधी । रावेर शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या साई सिध्दी प्लास्टिक फॅक्टरीला आज दुपारी तिनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यात सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून अग्निशामक गाड्या घटनास्थळी येऊन लागलेली आग आटोक्यात आणली आहे.
या बाबत वृत्त असे की रावेर शहरातील एमआयडीसी भागात साई सिध्दी प्लास्टिक फॅक्टरी आहे. येथे जमा केलेल्या प्लास्टिकला गोळे तयार करून बाहेर पाठवले जातात. आज येथे काम बंद असतांना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान फॅक्टरीत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. आग खुप मोठ्या प्रमाणात असल्याने येथे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. माजी नगराध्यक्ष शितल पाटील व पंकज वाघ यांनी या घटनेची माहिती फॅक्टरी मालक आनंद शहाणे यांना दिली. त्यांनी नगर पालिका प्रशासन व महसूल प्रशासन यांना याबाबत वृतांत दिला आग विझवण्यासाठी रावेर व फैजपुर नगर पालिकेच्या अग्नीशामक बंबाला बोलविण्यात आले होते. सुमारे दोन तासा नंतर लागलेली आग आटोक्यात आली. सुमारे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत रावेर तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.