रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढीस लागला असून आज तब्बल २२ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील पेशंटचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यात बर्याच काळापर्यंत कोरोनाचा संसर्ग आढळून आला नव्हता. तथापि, लॉकडाऊनच्या उत्तरार्धात येथे कोरोनाचा संसर्ग आढळून आला. यानंतर तालुक्यात सातत्याने रूग्ण आढळून येत आहेत. यात आता हा संसर्ग वाढीस लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच आज तब्बल २२ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील ४ रूग्ण हे शहरातील तर अन्य तालुक्यातल्या विविध गावांमधील आहेत.
आज आढळून आलेले रूग्ण हे पुढील प्रमाणे आहेत. रोझोदा २, सावदा १, रसलपुर १, अटवाडे १, खानापुर १, केर्हाळा १, पिंप्री ६, रावेर ४, गाते २, वाघोदा १, चिनावल १ आणि विवरे १. यात तालुक्यातील पिंपरी येथे आज सर्वाधीक रूग्ण आढळून आले असून या माहितीला तहसील प्रशासनाने दुजोरा दिला आहे. दरम्यान, एकाच दिवशी इतक्या जास्त प्रमाणात रूग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.