रालोआमध्ये राम उरला आहे का ?

 

मुंबई: ‘वृत्तसंस्था । सत्ता आली, सत्ता गेली. अनेक घटक पक्ष सोयीनुसार सोडून गेले, पण शिवसेना व अकाली दल हे एनडीएचे दोन खांब कायम भाजपबरोबर राहिले. आता या दोन्ही पक्षांनीही ‘एनडीए’ला राम राम ठोकला आहे. त्यामुळं एनडीएत खरंच राम उरला आहे काय?,’ असा खोचक टोला शिवसेनेनं भाजपला हाणला आहे.

कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतरही मोदी सरकारनं त्यांच्याकडं दुर्लक्ष केल्यानं अखेर अकाली दलानं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनंतर अकाली दलाच्या रूपानं भाजपचे सर्वात जुने व सुरुवातीचे दोन्ही मित्र पक्ष आता बाहेर पडले आहेत. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या घटनाक्रमावर भाष्य करताना भाजपला जोरदार टोले हाणले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे, असा दावा शिवसेनेनं केला आहे.

‘आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? हा प्रश्न आहेच. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे? पंजाब आणि महाराष्ट्र ही दोन मर्दानी बाण्याची राज्ये आहेत. अकाली दल व शिवसेना हे त्या मर्दानगीचे चेहरे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी हाच उल्लेख करावा लागेल,’ असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.

Protected Content