मुंबई प्रतिनिधी । अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू होत असतांना यासाठी प्राण अर्पण करणार्या हुतात्म्यांचे स्मारक हवे अशी मागणी आज शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात अयोध्येतील श्री राम मंदिराच्या कामाला गती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करतांना काही अपेक्षादेखील व्यक्त करण्यात आल्या आहेत. यात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अयोध्येत राममंदिराच्या कार्यास गती मिळाली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ साली होत आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम हे प्रचाराचे मुख्य अतिथी असतील हे आता पक्के झाले आहे. कारण पाकिस्तान किंवा सर्जिकल स्ट्राइक वगैरे विषय २०२४ साली चालणार नाहीत. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांनी सुरुवातीपासून अयोध्या आंदोलनाचे नेतृत्व केले व या कार्यास त्यांनी वाहून घेतले होते हे खरेच आहे, पण शिवसेना, बजरंग दल, इतर काही हिंदुत्ववादी पक्ष, संघटना या आंदोलनात सहभागी झाल्याच होत्या. हे कसे विसरता येईल? करसेवकांच्या हौतात्म्याने शरयू लाल झाली. त्यात देशभरातील शिवसैनिकांचे रक्त उसळताना दिसत होतेच. बीबीसीचे मार्क टुली यांनी अयोध्या आंदोलनाची जी चित्रफीत बनवली त्यात बाबरीच्या अवतीभोवती धडका देणाऱयांत शिवसेनेचे अनेक परिचित चेहरे दिसत आहेत. बाबरीच्या घुमटावर चढून काम फत्ते करणारेही शिवसैनिक होते व या राष्ट्रकार्याची जबाबदारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बेडरपणे स्वीकारली होती. मात्र त्याचे राजकीय भांडवल शिवसेनेने कधीच केले नाही.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, रामलल्ला जे आज अवघडल्या अवस्थेत तंबूत विराजमान आहेत ते लवकरच स्वतःच्या हक्क्याच्या भव्य जागेत, सिंहासनावर आरूढ व्हावेत अशी जगभरातील भक्तांची इच्छा व श्रद्धा आहे. अयोध्येत भव्य राममंदिर होणे म्हणजे कोटी कोटी जनतेच्या भावनांचा सन्मान होण्यासारखे आहे. जुन्या कबरी खोदून वातावरण खराब करण्यात आता अर्थ नाही, पण देशवासीयांची इच्छा एकच असेल, दिल्लीत जसे अमर जवान ज्योत सैनिकांच्या हौतात्म्याची सदैव आठवण करून देत असते तसे एखादे स्मृतिस्थळ शरयूच्या किना़र्यावर असावे व त्यावर राममंदिरासाठी शहीद झालेल्या वीरांची नावे कोरून ठेवावीत. हे शहीद कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नव्हते. त्यांनी देश, धर्म व अस्मितेसाठी सर्जिकल स्ट्राइक केला. त्यांच्या बलिदानातूनच भाजपसह शिवसेनेला आजचे दिवस दिसत आहेत. बाकी काय ते श्री. उद्धव ठाकरे ७ मार्चला प्रत्यक्ष अयोध्येत बोलतीलच. श्रीरामाचे काम हे राष्ट्राचे काम आहे. तेथे आता कुणाच्या आडकाठ्या नकोत. सर्वोच्च न्यायालयाने जे ठरवले त्यावर अंमलबजावणी व्हायलाच हवी अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे.