अलाहाबाद : वृत्तसंस्था । राम मंदिराच्या नावावर पैसे उकळण्याची बोगसगिरी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. बजरंग दलाच्या नावानं पावत्या छापून पैसे गोळा करण्याचं काम काहीजणांकडून सुरू होतं. याप्रकरणी हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे
अयोध्येत राम मंदिर उभारणीचं काम सुरू झालं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिर उभारण्यासाठी निधी गोळा करण्याचंही काम सुरू झालं आहे.
राम मंदिर निर्माणासंबंधीत मुरादाबाद येथील समितीच्या पदाधिकाऱ्यानं कथित हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध तक्रार दिली होती. फिर्यादीवरून मुरादाबाद सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम मंदिर निधी संकलन समितीचे मंत्री प्रभात गोयल यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या नावाखाली पैसे उकळण्याचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध आम्ही तक्रार दाखल केली. राम मंदिर निर्माणाचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आणि केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या ट्रस्टद्वारे सुरू आहे. अयोध्येतील जो ट्रस्ट आहे, त्याचे मंत्री चंपक रॉय आहेत. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व संघटना मंदिर उभारणीवर काम करत आहेत,” असं गोयल म्हणाले.
“शनिवारी आमचे काही पदाधिकारी कृष्णनगर परिसरात गेले होते. त्यावेळी तिथे काही लोकांनी त्यांना सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी त्यांनी देणगी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी एकवीस रुपये आणि पन्नास रुपये देणगी दिलेल्या पावत्याही दाखवल्या. पावत्या बघितल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी विचारणा केली. देणगी कुणाला दिल्याची चौकशी केल्यानंतर त्यांनी चार पाच लोकांची नावं सांगितली. सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही कॉल करून त्यांची चौकशी केली. त्यावर त्यांनी आम्ही देणगी जमा करत असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. देणगी गोळा करण्याचा अधिकार कुणालाही नसताना हे निधी गोळा करण्याचं काम करत होते,” असं त्यांनी सांगितलं.
“विश्व हिंदू परिषदेच्या बंजरंग दल संघटनेच्या नावानेच या लोकांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या नावानं संघटना बनवली. त्याचबरोबर बनावट पावत्या छापल्या. त्यावर राम मंदिराचा फोटोही छापण्यात आलेला आहे. बजरंग दलाला बदनाम करण्याबरोबर लोकांना गंडवण्याचं काम सुरू असल्याचं माहिती पडल्यानंतर आम्ही तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती गोयल यांनी दिली.