लखनऊ (वृत्तसंस्था) आपली मातृभूमी स्वर्गाहून अधिक महत्त्वाची असते हाच श्रीरामांचा संदेश आहे. आपला देश जितका शक्तिशाली होईल, तितकी शांती तयार होईल. रामाची हीच नीती आपलं मार्गदर्शन करत राहील. गांधींचं रामराज्य देखील यातूनच येईल. राम आपल्या काळानुसार चालण्यास शिकवतात. राम आधुनिकतेचे प्रतिक आहे. त्यांच्या याच विचाराने भारत आज पुढे जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधित केले. जय श्रीरामचा नारा देऊन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. राम मंदीराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अयोध्येत श्रीराम मंदिर भुमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. राममंदीराचा शिलान्यास आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. अयोध्येचे अर्थतंत्र बदलेल, अनेक संधी उपलब्ध होतील. संपूर्ण जगातील लोक प्रभु रामाचं दर्शन घेण्यासाठी येतील. अनेक वर्षे टेंटखाली राहत असलेले आमच्या रामललांसाठी आज एक भव्य मंदिर उभारले जात आहे. तुटने आणि पुन्हा उभे राहणे शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या चक्रातून आज राम जन्मभूमी मुक्त झाली आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी राम जन्मभूमी आंदोनलाची सांगड स्वातंत्र्याच्या लढ्याशी अथवा आंदोलनाशीही घातली. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलने झाली. १५ ऑगस्टचा दिवस त्या आंदोलनांचा आणि हुतात्म्यांच्या भावनांचे प्रतिक आहे. अगदी त्या प्रमाणेच राम मंदिरासाठीही अनेक शतके अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले. आजचा हा दिवस त्याच तपाचे आमि संकल्पाचे प्रतिक आहे. राम मंदिराच्या आंदोलनात संघर्ष आणि संकल्प होता, असे मोदी म्हणाले.