पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांच्यासह बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून याचे व्यापक पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र आणि विचारप्रवाह हा ग्रंथाचे आज पुण्यात शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यात त्यांनी ‘शिवरायांच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांचे योगदान काय ?’ असा सवाल उपस्थित केला. ‘शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या. त्या फक्त जिजाऊ होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणार्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही’, असं पवार म्हणाले.
दरम्यान, याप्रसंगी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय केल्याचे पवार म्हणाले.