जळगाव सचिन गोसावी । शहरातील रामदास कॉलनी भागात उभारण्यात येणारे रामदास पार्क हे येथे करावे की करू नये ? याबाबत आधीच अनेक वाद झाले आहेत. नगरसेवक बंटी जोशी यांनी जाहीरपणे हा प्रकल्प करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र नंतर बर्याच नागरिकांनी हा प्रकल्प व्हावा अशी मागणी केली आहे. यामुळे लोकशाही पध्दतीत या प्रकल्पाबाबत नगरसेवक बंटी जोशी हे नागरिकांचा कौल जाणून घेत आहेत. यासाठी त्यांनी स्वाक्षरी अभियान राबविले आहे.
नगसेवक बंटी जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, रामदास पार्कच्या कंपाऊंडवॉलसाठी मनपाने ८३ लाख मंजूर केले असून ही फाईल नाशिक विभागीय आयुक्त कार्यलयात आहे. ती लवकरच मंजूर होऊन येणार असल्याची माहिती दिली. आतील बगीच्याचे जवळपास १ कोटींचे काम पीपल्स बँक करणार आहे. तसेच ३५-४० लाखांचे खर्च अपेक्षित असलेले अत्याधुनिक शौचालय सुप्रीम कंपनी बनवून देणार होती. याचा उपयोग बगीच्यात येणाऱ्या नागरिकांना व या परिसरातील नागरिकांना झाला असता मात्र, दीड महिन्यापूर्वी भूमिपूजन होत असतांना समर्थ कॉलनी येथील १०-१५ जेष्ठ नागरिकांनी विरोध दर्शवून तास-दोन तास चुकीच्या पद्धतीने गोंधळ घालून भूमिपूजन रद्द करायला लावले होते.
नागरिकांची दिशाभूल करून विरोध
मी ज्या प्रभागातून निवडून येतो त्यांना नाराज करून कुठला प्रकल्प उभारावा हे मला व माझ्या नेत्यांना रुचले नसल्याने या बागेची संकल्पना आम्ही सोडून दिली होती. यानंतर आम्ही जनतेची माफी मागून हा प्रकल्प रद्द केला. मात्र, काही नागरिकांनी आमचे नेते नितीन लढ्ढा, महापौर जयश्री महाजन, नगरसेवक नितीन बरडे व मला भेटून हा प्रकल्प रद्द करू नये अशी मागणी केली. हा प्रकल्प रामदास कॉलनीत उभारला जात असतांना समर्थ कॉलनीतील दिशाभूल करण्यात आलेल्या १०-१५ नागरिकांच्या मागणीवर प्रकल्प रद्द करू नये असे सांगितले. प्रकल्प रद्दचा निर्णय हा सर्व नागरिकांना प्रत्यक्ष बोलवून घेतला पाहिजे, ६०-७० वर्षांपासून पडून असलेल्या जागेवर जर प्रकल्प उभा राहत असेल आणि तो प्रकल्प दिशाभूल केलेल्या नागरिकांमुळे रद्द करत असाल तर योग्य नव्हे असे मत मांडण्यात आले. तसेच परिसरातील रामदास कॉलनी, विद्या नगर, समर्थ नगर, प्रभात कॉलनी, जय नगर या सर्व नागरिकांना तुम्ही विश्वासात घेऊन, त्यांची मते जाणून तुम्ही हे काम पुन्हा सुरु करावे, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही स्वाक्षरी अभियान राबवा आम्ही येवून स्वाक्षरी करू, घरोघरी जावून स्वाक्षरी घेवू हा प्रकल्प पूर्ण करा असा संपूर्ण पाठींबा दर्शविल्याने दोन दिवशीय स्वाक्षरी अभियान राबवीत असल्याचे बंटी जोशी यांनी पुढे सांगतिले. गेल्या पंचवार्षिकला येथे भाजपच्या विद्यमान नगरसेविका यांनी स्वर्गीय निखील खडसे उद्यान म्हणून भूमिपूजन देखील केले होते. मात्र,पाच वर्षात हे काम होवू शकले नसून याचे शल्य त्यांना आहे. ते करू शकले नाहीत ते मी करतो आहे. आम्हाला याचे श्रेय मिळू नये यासाठी लोकांची डोके त्यांनी खराब केलीत, आम्हीही केले नाही तुम्हीही करू नका या भूमिकेसाठी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप बंटी जोशी यांनी केला. स्वाक्षरी मोहीमद्वारा चांगला प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे नगरसेवक जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले. आज स्वाक्षरी मोहिमेच्या पहिल्या दिवशी १०० पेक्षा जास्त नागरिकांनी रामदास पार्क समर्थनार्थ स्वाक्षरी केली असून उद्या सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते ७ मोहीम राबविण्यात येणार. यानंतर घरोघरी जावून स्वाक्षरी मोहीम राबवू अशी माहिती नगरसेवक बंटी जोशी यांनी दिली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/841999983091554