मुंबई (वृत्तसंस्था) राज्य शासन भारताच्या निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या स्थगित केलेल्या निवडणुका घेण्याबाबत विनंती करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, विधानपरिषदेवर उद्धव ठाकरेंची नियुक्ती करावी मंत्रिमंडळाच्या या ठरावावर राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणे अपेक्षित होतं मात्र करोना वायरसच्या फैलावामुळे निवडणूक आयोगाने त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. परंतू मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे विधान मंडळाच्या दोन्ही पैकी कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. २७ मे पर्यंत त्यांना विधान मंडळाचे सदस्य व्हावे लागेल अन्यथा राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसेल. यामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर उद्धव ठाकरेंची नियुक्ती करावी, असा ठराव पाठविण्यात आला होता. त्याच्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, राज्य शासनातर्फे लवकरच निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या निवडणुका सध्याची परिस्थिती लक्षात घेता लवकर घेण्यात याव्यात, असे पत्र देण्यात येणार असल्याचे कळते.