मुंबई (वृत्तसंस्था) वांद्य्रातील घटनेनंतर उलट राज्याने रेल्वे मंत्रालयावर गुन्हा दाखल केला पाहिजे. रेल्वे मंत्रालयाकडून पत्रक काढण्यात आले. मात्र, त्यांनी गाड्या सोडल्या नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन गर्दी जमली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न असून हे सर्व ठरवून केले जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटात चांगले काम करतायत याचे अनेकांना दु:ख होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा फायदा घेऊन राज्यात संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांमध्ये उद्रेक घडवून हे राज्य अस्थिर व खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळातच यापूर्वी सुरतमध्ये जाळपोळीसारखा भयंकर प्रकार घडला. मात्र, त्यावर विरोधकांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. तेव्हा कोणीही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. परंतु, वांद्र्यातील घटना सातत्याने चर्चेत ठेवली जात असून हे सर्व ठरवून सुरु असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. संकटाच्या काळातही विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याऐवजी राजकीय लाभासाठी वेगळी चूल मांडली आहे. मात्र, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांचे बाप, आजी-आजोबा अशा १०० पिढ्या उतरल्या तरी उद्धव रिजाईन ही संकल्पना वास्तवात येणार नाही,असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले