मुंबई वृत्तसंस्था । लॉकडाऊन लागू होवू पंधरवाडा संपला आहे. लॉकडाऊनचे दिवस कमी-कमी होत असताना राज्यातील करोना बाधितांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात १२ ते १४ तासांत करोनाग्रस्तांमध्ये १६२ रुग्णांची भर पडली असून करोना बाधितांची संख्या गुरुवारी १२९७ वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य विभागाने कळविले आहे.
नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील सर्वाधिक १४३ रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात ४, पुणे, औरंगाबादमध्ये प्रत्येकी ३, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर, यवतमाळ, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. राज्याचा मृत्यूदर वाढला असून सहा टक्क्यांवर आला आहे. तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. करोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.