ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रोशनी शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केली, यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल ठाणे शहरात अमानुष मारहाण करण्यात आली. त्यावरुन आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री ? असा प्रश्न आता पडला आहे. एकनाथ शिंदे आता गुंडांचे मंत्री झाले आहेत. मनात आणल तर आता या क्षणाला ठाणेच काय अवघ्या महाराष्ट्रातून या गुंडांची गुंडगिरी आम्ही उखडून फेकून देऊ शकतो. राज्य सरकार नपुंसक असेल. मात्र, शिवसैनिक हा नपुंसक नाही. बाळासाहेबांच्या नावाने या गुंडांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. मात्र, महिलांवर हल्ला करणारे हे नपुंसक आहेत.
हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला अतिशय फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. लाचार, लाळघोटे करणारे, नुसते फडणवीसी करणारा माणुस गृहमंत्रीपद मिरवतोय. त्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.