नाशिक : वृत्तसंस्था । नाशिकमध्ये ३० जणांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला असून, यापैकी २८ रूग्ण ग्रामीण भागातील आहेत.राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसताना व तिसऱ्या लाटेची शक्यता असताना, आता डेल्टाचा धोका वाढत आहे.
हे ३० रूग्ण डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे नमुने पुणे येथे जिनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा रूग्णालयामधील सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिली आहे.
डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक अपडेटमध्ये म्हटलंय. जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, २६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ४० लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असेही अपडेटमध्ये म्हटले आहे.
मूळ विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे कोरोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.