अहमदनगर: वृत्तसंस्था । विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. कोरोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.
१५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. त्यावरूनही राजकारण पेटले होते. प्रकरण कोर्टातही गेले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.
१० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असताना ग्रामीण भागात निवडणुकांची जोरदार धामधूम पाहायला मिळणार आहे. को रोना संबंधीच्या नियमांचे पालन करून निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब या निवडणुकांमध्येही पहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवविण्याची घोषणा अलीकडेच केली आहे. भाजपने स्वबळाचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. दोन्ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका अद्याप जाहीर व्हायची आहे. येत्या काळात या राजकीय जुळवाजुळवीला वेग येणार आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रथमच होत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसली तशीच चुरस यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. प्रशासक नियुक्त्यांच्यावेळी झालेल्या राजकारणातून याची झलक पहायला मिळाली आहे. ग्रामीण भागावर आपली पकड मजबूत करण्यासाठी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत बाजी मारणाऱ्या महाविकास आघाडीसाठी ही राजकीय आखाड्यातील दुसरी परीक्षा ठरणार आहे.
तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर २०२० , उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर २०२० (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) , उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२० , उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ जानेवारी २०२१ , मतदान : १५ जानेवारी २०२१ (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच) , मतमोजणी : १८ जानेवारी २०२१.