जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात गोसेवा आयोग स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी गोशाला महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना बुधवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. राज्यात सध्या लहान मोठ्या ९५० गोशाळा असून यात वृद्ध, भाकड व अपंग तसेच पोलिसांनी अवैध वाहतुकीतून पकडलेले १ लाख ८७ हजार गोवंशाचे पालन पोषण करण्यात येत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि अन्य राज्यात गोशाळेचे सक्षमीकरण करण्यासाठी त्या त्या राज्यांनी राज्यात सेवा आयोगाची स्थापना केलेली आहे. तसेच कृषीप्रधान महाराष्ट्र राज्यात शेती, पर्यावरण, रोजगार याचा समतोल राखण्यासाठी देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक, समृद्धी व ग्रामीण क्षेत्रातील रोजगार निर्मिती करिता देशी गोवंशाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात गोसेवा आयोग स्थापन करणे बाबत तांत्रिक व प्रशासकीय कारवाई सुरू केली होती. त्यामुळे आता महाराष्ट्रात गोसेवा आयोग स्थापन करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन शहरातील गोशाळा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना बुधवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर विनायक सोनवणे, गोकुळ कोळी, प्रकाश पाटील, दीपक पाटील, विजय घाणेकर, रोहित महाले, मधुकर पंडित, प्रवीण पाटील, यासह इतर गोप्रेमींचे स्वाक्षऱ्या आहेत.