मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीनपटीने वाढून ४३.३५ टक्के एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिला रुग्ण आढळल्यानंतर ३१ मार्च अखेर राज्यात ३०२ रुग्ण होते. त्यातील ३९ रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्चमध्ये करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १२.९१ टक्के एवढे होते. एप्रिलअखेर राज्यात १० हजार ४९८ रुग्ण होते. त्यातील एक हजार ७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १६.८८ टक्के होते.
राज्यात ३१ मे अखेर ६७,६५५ रुग्णांपैकी २९ हजार ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे मे अखेरीस राज्याचा ‘रिकव्हरी रेट’ मार्चच्या तुलनेत सुमारे साडेतीनपटीने वाढत ४३.३५ टक्के एवढा झाला आहे. राज्य सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजना, लॉकडाउन, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे त्यासोबतच केंद्र सरकारने सुधारित ‘डिस्चार्ज पॉलिसी’ जाहीर केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी आठ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदविला गेला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.