चंद्रपूर (वृत्तसंस्था) कोरोना संकट वाढत असले तरी एका एसटी बसमध्ये २० पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता राज्यात आंतरजिल्हा बस सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केली आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार आहोत. सोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून प्रारंभ करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. ऐन संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. प्रसंगी मेस्मा लावला जाणार आहे. चंद्रपूर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील ५ डॉक्टरांना याचसाठी नोटिसा जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले.