मुंबई प्रतिनिधी । वीज बिलाबाबत निर्णय होणार नाही तोवर राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज तोडणी करण्यात येणार नसल्याची महत्वाची घोषणा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उर्जा खात्यातर्फे धडक वीज बील वसुली मोहिम राबविण्यात येत असून भाजपने याला विरोध दर्शविला आहे. आज विधानसभेत याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, कोरोनामुळे सर्वच जण अडचणीत आले असतांना महावितरणतर्फे सक्तीची वीज बील वसुली करण्यात येत आहे. या अनुषंगाने शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांची जोडणी तोडली जात आहे. याबाबत राज्य सरकार निर्णय घेत नाही तोवर ही मोहिम बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शवत वीज बिलांबाबत विधानसभेत चर्चा होईल तोवर राज्यातील कृषी तसेच घरगुती वीज कनेक्शन्स तोडले जाणार नाहीत याची घोषणा केली. यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.