नवी दिल्ली: वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद आणि शिर्डी या तिन्ही विमानतळांचे नामांतर होण्याची दाट शक्यता आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने तसा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विमानतळाचं नामांतर ‘छत्रपती राजाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ करण्यास केंद्र सरकारने अनुकूलता दर्शविल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
नागरी उड्डाण मंत्रालयाने कोल्हापूर, औरंगाबाद, शिर्डीसह देशातील १३ विमानतळांच्या नामांतराचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यातील काही प्रस्तावांवर केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. तर ज्या नावांवर वाद आहेत, अशा विमानतळांचे प्रस्ताव वेटिंगवर ठेवल्याचं समजतं.
, फेब्रुवारी २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू हे कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्यावतीने कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यात येत असल्याचं जाहीर करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. त्यामुळे आता होणाऱ्या बैठकीत या नामांतरावर निर्णय होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला साईबाबांचे नाव देण्यात येणार आहे. श्री साईबाबा संस्थानाने विमानतळाच्या नामांतराचा ठराव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाठवला होता. या विमानतळाचे ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याचा हा ठराव होता. राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे शिर्डी विमानतळाच्या नामांतराचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
मार्च २०२० मध्ये राज्य सरकारने औरंगाबाद विमानतळाचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याचा निर्णय घेतला होता. तसं ट्विटही राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलं होतं