राज्यातील देवस्थान समित्या बरखास्त करण्याच्या हालचाली

 

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील विद्यमान मंदिर समित्या बरखास्त करून नवीन समित्या जाहीर होणार असून यात महाराष्ट्राचे दैवत मानल्या जाणार्‍या पंढरपुरच्या समितीवर शिवसेनेच्या सदस्याची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकासआघाडीतील मित्रपक्षांनी वाटून घेतलेल्या समित्यांमध्ये पंढरपूरची मंदिर समिती शिवसेनेकडे गेली असून यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार आहे. टिव्ही-९ या वाहिनीनी याबाबत वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार राज्यातील महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर सरकारने अनेक महामंडळे बरखास्त केली होती. पण देवस्थान समित्यांमध्ये कोणतेही बदल केले नव्हते. मात्र आता भाजपच्या ताब्यातील देवस्थान समित्या काढून घेण्यासाठी राज्य पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने विविध मंदिर समितीवर वर्णी लावण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी लॉबिंग सुरु केले आहे.

शिर्डीत सध्या तदर्थ समिती काम पाहत आहे. जुन्या विश्‍वस्तांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन विश्‍वस्त किंवा अध्यक्ष नेमण्यात आले नाहीत. सध्या जिल्हा न्यायाधीश प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. राज्य सरकारच्या विधी न्याय खात्याकडून शिर्डी संस्थान विश्‍वस्तांची नेमणूक होते. या अनुषंगाने शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद मिळण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. तर पंढरपूर येथील श्रीविठ्ठल मंदिराच्या समितीसाठी शिवसेना आग्रही असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content