राज्यातील गरिबांसाठी 50 हजार कोटींचे पॅकेज द्या ; फडणवीसांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा प्रकारच्या सर्व गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारविरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असे म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला आहे. आज फडणवीसांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर अंगणात आंदोलन केले.

 

यावेळी फडणवीस म्हणाले की, सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आणि काही लोकांना आपला प्रवक्ता करुन आपण लढाई जिंकू असे सरकारला वाटत आहे. कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘ माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्राचे पैसे राज्य सरकार खर्च करत नाही, रेशनही केंद्राने पुरवले, आता खरिपाचा हंगाम आहे, शेतकऱ्यांना जी मदत हवी, त्याबद्दल काही पावले उचलली नाहीत, अजूनही कापूस घरी आहे, पीकं पडून आहेत, शेत माल उचलला नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. ज्या पिकांची खरेदी होते त्याचे पैसे केंद्र देते, पण राज्याने ती खरेदी करायची असते, पण ते कामही राज्य करत नाही, केंद्राने राज्याला पैसेही दिले आहेत. मजूर, बारा बलुतेदार संकटात आहेत, त्यांना कोणतीही मदत राज्य सरकारने केलेली नाही. केंद्राने 20 लाख कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले, पण राज्य सरकारने एक दमडीचेही पॅकेज दिले नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करतंय. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही. केंद्राने 468 कोटी दिले, याशिवाय 1600 कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच असंघटीत कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याबाबत निर्णय घ्यायला हवा, कोरोनाचे उपचार मोफत व्हायला हवेत, खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन सर्वांवर मोफत उपचार व्हावे. शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा प्रकारच्या सर्व गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली. तसेच बीकेसी सेंटर तर दोन दिवसात भरुन जाईल अशी परिस्थिती आहे. पाऊस पडल्यावर काय करणार माहिती नाही. तो प्रश्नही उभा राहणार आहे. रुग्ण व्यवस्थेसंदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही योग्य पाऊलं उचलली जात नाही आहेत,” अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

Protected Content