मुंबई: वृत्तसंस्था । महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
१४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत.त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्यानं ती पुढे ढकलण्यात यावी, असं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती.