राज्यसभेत गोंधळ : आम आदमी पक्षाचे ३ खासदार निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ राखून ठेवण्यावर संमती झाली. मात्र, त्यापूर्वी ‘आप’च्या खासदारांनी राज्यसभेत घोषणा देत गोंधळ घातला. त्याच्यावर सभापतींनी कारवाई करत निलंबित केले.

 

आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होताना दिसत असून, राज्यसभेतही यांचे तीव्र पडसाद उमटले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकाकडून करण्यात आली.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून, शेतकरी आंदोलनाची धग आणखी वाढली आहे. आज सकाळी राज्यसभेत कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. त्यावरून सभागृहात बराच गदारोळ झाला. अखेर विरोधकांच्या मागणीची दखल घेत सभापतींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ राखून ठेवला. मात्र, ही चर्चा सुरू होण्यापूर्वी आपच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आप खासदारांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीन खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केलं. २५५ नियमानुसार सभापतींनी आपच्या तीन खासदारांवर कारवाई केली.

“सभागृहाचे काही सदस्य मोबाईलद्वारे सभागृहाच्या कामकाजाची शुटिंग करत असल्याचं दिसून आलं आहे. हे वर्तन संसदीय शिष्टाचाराच्या विरोधात आहे,” असं म्हणत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संताप व्यक्त केला. कामकाज तहकूब केल्यानंतर पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापतींनी सदस्यांची कानउघाडणी केली.

Protected Content