नवी दिल्ली वृत्तसंस्था । राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज खासदारकीची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.
महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती झाली. त्यापैकी सहा जणांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या नावाचा पुकारा केला, मात्र त्या गैरहजर असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांना शपथ घेण्यासाठी बोलवण्यात आले.
काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा झेंडा हाती धरलेल्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप प्रवेश केलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजेंनी इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ असा नारा दिला मात्र सदनात कोणत्याही घोषणा चालत नाहीत, हे यापुढे लक्षात ठेवा, अशी आठवण व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना करुन दिली.
महाराष्ट्रातील सात खासदार
उदयनराजे भोसले – भाजप
भागवत कराड – भाजप
रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
शरद पवार – राष्ट्रवादी
फौजिया खान – राष्ट्रवादी
राजीव सातव – काँग्रेस
प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना