जळगाव प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांच्यावर लिहण्यात आलेल्या पुस्तकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिप्राय पाठविला असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपालांकडेच खडसेंच्या आमदारकीची शिफारस पडून असतांना या शुभेच्छा फलदायी ठरणार का ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भुसावळ येथील प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी लिहिलेल्या जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे या पुस्तकाचे अलीकडेच प्रकाशन झाले असून त्याला चांगली लोकप्रियता लाभली आहे. दरम्यान, खडसेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुस्तकाची प्रत अवलोकनार्थ पाठविली होती. राज्यपाल कोश्यारी यांनी या पुस्तकावर तातडीने आपला अभिप्राय लिहून पाठविला आहे. या अभिप्रायातून कोश्यारी यांनी खडसेंच्या राजकीय, सामाजिक व सांसदीय कारकीर्दीचे कौतुक केले आहे.
राज्य सरकारने अलीकडेच विधानपरिषदेवरील १२ आमदारांच्या यादीत खडसे यांच्या नावाची शिफारस केली आहे. राज्य सरकारने विधान परिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस करून पाठविलेल्या एकनाथ खडसे यांसह अन्य नावांच्या यादीला राज्यपाल मंजुरी देता की नाही ? याबाबत साशंकता असताना राज्यपालांनी खडसे यांच्या विधानसभेतील योगदान व समाजसेवेबद्दल कौतुक करत यशाच्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. यामुळे त्यांना या शुभेच्छा लाभणार का ? याबाबत चर्चा रंगली आहे.