राज्यपालांमुळे राज्याचे लक्ष जळगावकडे !

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचे गुरू समर्थ रामदास असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल लागलीच जळगावात आले असल्याने आता ते येथे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे औरंगाबाद येथून काल सायंकाळी जळगाव येथे आले. तत्पूर्वी औरंगाबाद येथील कार्यक्रमातील त्यांचे वक्तव्य वादाच्या मोठ्या भोवर्‍यात सापडले आहे. यात त्यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख करत त्यांचे गुरू समर्थ रामदास असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून काल सायंकाळीच संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला होता. तर आज सकाळपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुध्दा राज्यपालांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे.

जळगावात राष्ट्रवादीने राज्यपाल कोश्यारी यांना काळे झेंडे दाखविण्याचे नियोजन केले होते. मात्र पोलिसांनी याआधीच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असले तरी राज्यपालांच्या विरोधातील वातावरण आता चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. यातच आता काही वेळातच राज्यपालांच्या उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन असून यात राज्यपाल नेमके काय बोलणार ? ते आपले वक्तव्य मागे घेणार की त्याचे समर्थन करणार ? याबाबत आता उत्सुकतेचे वातावरण निर्मिती झाले आहे.

Protected Content