मुंबई वृत्तसंस्था । कोरोना उपचाराबाबत राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. कोरोना सोबत जगताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
“सध्या आपल्याकडे करोनावर प्रतिबंधक लस नाही. लस येईपर्यंत किती महिने लागतील, सांगता येत नाही. लॉकडाऊन करत राहिलो तर आपल्या अर्थव्यवस्थेचं काय होईल? ज्यांचं हातावर पोट आहे त्याचं काय होईल? बिझनेस हाऊसेस, व्यवसाय बंद होतील,” असंही ते म्हणाले. दूरदर्शनवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
“राज्यात ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ सुरू आहे त्यामध्ये. १००० रुग्णालये आहेत, १०० टक्के कॅशलेस सेवा एक रुपया न घेता सगळ्या सुविधा देऊ शकतो. सामान्य गरीब रुग्ण डोळ्यासमोर आहे आणि त्याचे हित जपण्याच्या दृष्टीकोनातूनची धोरणं आखण्यात आलेली आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
“ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की हे वर्ष नफा-नुकसानीचा विचार करायचे नाही. हे वर्ष फक्त जगण्यासाठी आपण जगायला हवं. हे करीत असताना आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायजर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅण्डस्.) पद्धतीने जगावे लागेल,” असं टोपे म्हणाले.
अनावश्यक ठिकाणी जायचे टाळलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी, कोमॉर्बीड लोकांनी गर्दीत जाणे टाळावे. सध्या शाळा उघडल्या नाहीत, सतर्कता म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी पुन्हा सुरू करत नाही. पण एसएमएस पद्धतीचा वापर करून जरूर आपलं कार्य करावं आणि जेवढं टाळता येऊ शकत असेल त्या अनावश्यक गोष्टी जरूर टाळाव्यात, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
शाळा सध्या बंद असल्या तरी शिक्षण चालू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट फोन ज्यांच्याकडे आहे ते लोक ऑनलाइन स्कुलिंग करू शकतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाइन स्कूलिंग सर्वत्र अजून चालू नाही. काही अडचणी आहेत. ऑनलाइन स्कूलिंग १०० टक्के परिणामकारक आहे असे मला वाटत नाही आणि हे आपल्याला कायमस्वरूपी ऑनलाइन ठेवता येणार नाही. त्यामुळे लस येईपर्यंत हे असंच सुरू ठेवावं लागणार असल्याचेही ते म्हणाले. मुलांचं नुकसान निश्चितच होऊ नये. त्यांचं वर्ष वाया जाता कामा नये. जो काही गॅप पडला आहे, तो भरून काढण्यासाठी शिक्षणाची पद्धत असो, शिकवण्याची पद्धत असो किंवा कंटेन्टमध्ये बदल करायचे असोत, शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण थांबता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यावीच लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.