वॉशिंग्टन : वृत्तसंस्था । अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅट पॉटिंगर, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ स्टेफनी ग्रीशम आणि व्हाइट हाऊसचे उप प्रेस सचिव सारा मॅथ्यूज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
कॅपिटॉल इमारतीमध्ये आज जे घडलं, ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक सहकाऱ्यांना पटलेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे अमेरिकन लोकशाही व्यवस्थेला धक्का बसला आहे. स्टेफनी ग्रीशम यांनी व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव पदाची जबाबदारी सुद्धा संभाळली आहे. त्यांनी सर्व प्रथम राजीनामा दिला.
“व्हाइट हाऊसमध्ये राहून देशसेवा करणे हा एक सन्मान होता. लहान मुलांना मदत करण्याच्या मेलेनिया ट्रम्प यांच्या मोहिमेचा मी एक भाग होते, याचा मला अभिमान आहे ” असे ग्रीशम यांनी टि्वटरवर म्हटलं आहे.
“आज कॅपिटॉल इमारतीमध्ये मी जे बघितले, ते पाहून अस्वस्थ झाले. मी माझ्या पदावरुन तात्काळ पायउतार होत आहे. आमच्या देशाला शांततेने सत्ता हस्तांतरणाची गरज आहे” असे सारा मॅथ्यूज यांनी म्हटले आहे.
भावी राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच मोठया संख्येने ट्रम्प समर्थक राजधानी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीवर धडकले. कॅपिटॉल इमारतीमध्ये अमेरिकन काँग्रेसचे सभागृह आहे. इथे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्टोरल मतांची मोजणी सुरु होती. बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर विजय मिळवल्याची घोषणा करण्यात येणार होती. या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने हे सर्व घडवण्यात आले. कॅपिटॉल इमारत परिसरात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून ५२ जणांना अटक करण्यात आली आहे.