राजकीय, वैचारिक मतभेद, पण रक्षाताई माझ्या आवडत्या खासदार : सुप्रियाताई सुळे

जळगाव (प्रतिनिधी) राजकारणात आमचे वैचारिक मतभेद असतील, पण खासदार रक्षाताई खडसे या माझ्या आवडत्या खासदारांपैकी एक आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी खासदार रक्षाताईंच्या कामाचे कौतुक केले आहे.

 

शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘उडान नव संजीवनी’चे उद्घाटन सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रिया ताई म्हणाल्या की, काम करणाऱ्याचे राजकारणापलीकडे जाऊन कौतुक झाले पाहिजे. रक्षाताई धडपड करणारे नेतृत्व असून त्यांचे मला नेहमीच कौतुक वाटते. विरोधी पक्ष असतांनाही रक्षाताई यांचे कौतुक करतेय. पण जेव्हा निवडणुका असतील. तेव्हा त्यांच्याविरुद्ध सभा देखील घेईल. विरोधात असलो तरी समोरच्याच्या कामाचे कौतुक हीच तर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती आहे. राजकारणात असताना वैयक्तिक संबंधात कटुता यायला नको, असेही सुप्रिया सुळे म्हटल्या.

 

यावेळी उपस्थित मुलींना मार्गदर्शन करताना पुढे त्या म्हणाल्या की, निवडणुकीवेळी टोकाचा विरोध करतो मात्र ज्या वेळेस महाराष्ट्र प्रश्न येतो त्यावेळेस एकत्र येऊन काम करतो. महाराष्ट्र साठी राज्यातील सर्व खासदार एकत्र येऊन काम करतो, असेही त्या म्हणाल्या. मी स्वतःला दरवर्षी स्किल्ड करते. कारण जर मी स्वतःला असे केले नाही, तर मी टिकू शकणार नाही. यावेळी जळगाव संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, जळगावच्या मातीत संस्कृती लेखन शेती या गोष्टींचे फार मोठे योगदान आहे. जळगावने मला खूप काही प्रेम दिलेय आणि ते मी जवळून पाहिले सुद्धा आहे. त्यामुळे जळगावला येणे माझ्यासाठी 50 टक्के काम व 50 टक्के जेवण हा महत्त्वाचा विषय असतो.

 

Protected Content