*चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज* | तालुक्यातील जूनोने येथील मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा मानल्या जाणाऱ्या या रस्त्याच्या अभावामुळे जूनोने गावाचा विकास खुंटला आहे. यामुळे सदर रस्त्याची दुरुस्तीबाबत वनविभागाने परवानगी न दिल्यास कन्नड हद्दीपर्यंतचा २ कि.मी.चा रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
तालुक्यातील जूनोने गाव हे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या दोघा विभागाच्या सीमेवर वसलेला दोन हजार वस्तीचा गाव आहे. चाळीसगाव शहरापासून एकूण २५ कि.मी अंतरावर आहे. दरम्यान सदर गाव हा खान्देश विभागात मोडत असल्याने गावकऱ्यांना वन्यजीव अभयारण्यातून अडीच कि.मी.चा टप्पा पार करून जावे लागते. मात्र गत काही वर्षांपासून रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की, खड्यात रस्ता अशी विदारक परिस्तिथी सद्या त्याठिकाणी पाहायला मिळत आहे. मुलांच्या शिक्षणापासून तर वैद्यकीय सेवा अशा मूलभूत सुविधांपासून सदर गाव वंचित आहे. जिल्हा परिषद शाळेचा काही भाग पडलेला आहे. यामुळे विद्यार्थी देखील शाळेत फारसे येत नसावे असे लाजिरवाणा चित्र गावात दिसून आले. त्यामुळे शाळा ही फक्त नावारूपालाच उरली असावी. डोंगराळ भागात वसलेला हा गाव आजही मागास गाव म्हणून ओळखला जातो. हे भयावह चित्र फक्त एका रस्त्यांमुळे झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी यावेळी दिली. त्यामुळे सदर रस्ता वनविभागाने डांबरीकणासाठी परवानगी न दिल्यास गावापासून जवळ असलेल्या कन्नड हद्दी पर्यंतचा २ कि.मी.चा रस्ता करून द्यावा अशी मागणी सरपंच गोरख राठोड यांच्यासह माजी सरपंच ममराज पवार व ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे केली आहे. कन्नड तालुका जवळच असल्याने विद्यार्थांना लागणाऱ्या शिक्षणाबरोबरच सगळ्या सोयीसुविधेचा लाभ घेता येईल अशीही अपेक्षा सरपंच राठोड यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली आहे. दरम्यान खा. उन्मेष पाटील , आ. मंगेश चव्हाण व प्रशासनांनी याकडे जातीने लक्ष्य देऊन हि समस्या मार्गी लावावी अशी विनंतीही सरपंचांनी केली आहे.