मॉस्को: वृत्तसंस्था । आता रशियातही पुढील आठवड्यापासून लशीकरण मोहीम सुरू करण्याचे निर्देश राष्ट्रपती पुतीन यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या २० लाख डोसचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.
ब्रिटनने फायजरच्या लशीला मंजुरी दिल्यानंतर लस स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लस देण्यास सुरुवात होणार आहे
ब्रिटनने फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीला मंजुरी देण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने लशीकरणाची घोषणा केली. रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अंतरीम निष्कर्षात ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते. इतर लशीपेक्षा ही लस अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रशियात आरोग्य कर्मचारी, शिक्षकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात २० लाख डोस उपलब्ध होणार आहेत. रशियात ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लस घेण्याची सक्ती नसून ऐच्छिक बाब असणार आहे.
रशियाच्या थेट गुंतवणूक निधीने (आरडीआयएफ) लशीची किंमत जाहीर केली होती. ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. तर, इतर देशांमध्ये या लशीचा एक डोस १० डॉलरपेक्षाही (७४० रुपये) कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. लस चाचणीबाबतचा दुसरा अंतरीम निष्कर्षही समोर आला आहे. यामध्ये स्पुटनिक व्ही लस दिल्यानंतरच्या २८ दिवसांमध्ये ९१.४ टक्के प्रभावी ठरली आहे. तर, ४२ दिवसानंतर ही लस ९५ टक्के प्रभावी ठरली आहे. आरडीआयएफचे किरील दिमित्रीव्ह यांनी सांगितले की पुढील वर्षात ५०० दशलक्ष नागरिकांना लस देण्याचे रशिया आणि भागिदार असलेल्या देशांचे उद्दिष्ट आहे. रशियन लशीची किंमत कमी असल्यामुळे जगभरातील अधिकाधिक नागरिकांना लस परवडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मॉडर्ना आणि फायजर यांच्या लशीपेक्षा ‘स्पुटनिक व्ही’ची किंमत कमी असणार असल्याचे याआधीच रशियाकडून स्पष्ट करण्यात आले होते. फायजरची किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर (१४४६.१७ रुपये) आणि मॉडर्नाची किंमत २५ ते ३७ डॉलर (१८५४ ते २७४४ रुपये) इतकी असणार आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती ३९ डॉलर आणि ५० ते ७४ डॉलर इतकी लशीची किंमत असणार आहे. फायजर, मॉडर्ना आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसची आवश्यकता असणार आहे.