टोक्यो : वृत्तसंस्था । ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे
त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला आहे. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. सुरुवातीला ५-९ अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश झाला आहे.
उपांत्य सामन्यामध्ये रवी कुमार दहीया खरंतर सेकंड हाफमध्ये ९-२ असा पिछाडीवर पडला होता. पण त्यानंतर दहीयानं जोरदार कमबॅक करत सलग पाच गुणांची कमाई केली. कझाकिस्तानच्या सनयेवला पराभूत करत दहीयानं झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी मेडल जिंकणारा रवी कुमार दहीया पाचवा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी के. डी. जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या चार खेळाडूंनी भारतासाठी मेडल जिंकण्याची कमाल केली होती. त्यानंतर आता रवी कुमार दहीया याने भारतासाठी रौप्य पदकाची निश्चिती केली असून त्याची नजर आजा सुवर्ण पदकावर असणार आहे.
एकीकडे कुस्तीमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा रवी कुमार दहीया पाचवा खेळाडू ठरला असताना दुसरीकडे फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५७ वजनी गटामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा रवीकुमार दहीया हा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी कुस्तीपटू सुशील कुमार २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
बल्गेरियाच्या खेळाडूचा पराभव करून रवीकुमारने फ्रीस्टाईल कुस्ती प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. ५७ किलो वजनी गटामध्ये रवी दहियाने बुल्गेरियाच्या वॅलिंटिनोवचा १४-४ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीलाच रवीने वॉलिंटिनोववर ६-० ची आघाडी मिळवली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. रवीने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. रवीच्या डावपेचांसमोर बुल्गेरियन कुस्तीपटू फारच फिका पडल्याचं चित्र सामन्यामध्ये दिसलं.
सोनीपत जिल्ह्यातील जवळपास १५ हजार लोकसंख्येचे नाहरी गाव कुस्तीपटू रवी दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा करीत होते. कारण रवीच्या पदकामुळे गावाचा विकास होईल अशी त्यांना आशा आहे. रवीच्या नाहरी गावातील नागरिकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी धडपडायला लागते. दिवसभरात दोन तास वीजपुरवठा होतो, त्यात सर्व कामे उरकावी लागतात. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठीही योग्य व्यवस्था येथे नाही. गावात फक्त महत्त्वाचे असे एक पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. त्यामुळे रवीने पदक जिंकल्यास गावचे चित्र पालटू शकेल, असं या गावकऱ्यांना वाटतंय.
शांत स्वभावाच्या रवीचे वडील राकेश कुमार दहिया हे शेतकरी आहेत. महावीर सिंग (१९८०-मॉस्को, १९८४-लॉस एंजेलिस) आणि अमित दहिया (लंडन-२०१२) यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा रवी हा तिसरा क्रीडापटू आहे.