जळगाव, प्रतिनिधी । शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच वापर वाढून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या कार्यपद्धतीत शासनाकडून सुधारणा करण्यात आली असल्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.
पीक स्पर्धा ही तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र १००० हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरीता पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतक-यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी रु.३०० प्रति शेतकरी प्रति पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क राहणार आहे. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे. रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० असून जास्तीत जास्त शेतक-यांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हायवे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.