जळगाव प्रतिनिधी । चुलत बहिणीकडे रक्षाबंधन आटोपून पुन्हा आपल्या गावी परत जात असतांना ४० वर्षीय तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात बहिणबाई विद्यापीठासमोर घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, रक्षाबंधन साजरा करण्यासाठी अजय युवराज मनोरे वय 40 रा. रत्नापिंप्री हा त्याच्या दुचाकीने दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील अयोध्यानगरात असलेल्या कांकाच्या घरी आला होता. मंगळवारी दुपारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यावर अजय हा दुचाकीने आपल्या गावी रत्नाप्रिंपी जाण्यासाठी निघाला. यादरम्यान विद्यापीठासमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ये-जा करणार्या वाहनधारकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तसेच जखमी तरुणाकडे असलेल्या मोबाईलमधील संपर्क क्रमांकावर संपर्क साधून त्याच्या मोठ्या भावाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यावर अजय याचा मोठा भाऊ सचिन याने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तोपर्यत अजयची प्राणज्योत मालवली होती. जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत कार्यरत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे शिवदास चौधरी व राजेंद्र ठाकरे यांनी पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.