भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । होळीच्या सणानिमित्त शहरात रंग आणि पिचकारी विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा रंगांचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. इंधनाची दरवाढ झाल्याने त्याचा परिणाम रंगांच्या दरावर झाला आहे. शहरात पर्यावरणपूरक रंग आणि पिचकारीच्या व्यावसायातून सुमारे २० लाख रूपयांची उलाढाल होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. कानपूर येथील रंग शहरात विक्रीसाठी आले आहेत.
कोरोनाच्या महामारीत दोन वर्षे होळी धुलीवंदनाचे कार्यक्रमांचा पुरेसा आनंद घेता आला नाही. त्यामुळे यंदा या सणांचा उत्साह मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर रंग विक्रेत्यांनी दुकाने मांडली आहे. सुट्या रंगासोबतच आकर्षक पॅकिंगमध्येही रंगाचे डबे आणि पाऊच बाजारात उपलब्ध आहेत. कोरोनानंतर यंदा प्रथमच होळीचा सण निर्बंधमुक्त आहे. त्यामुळे दिल्ली, इंदूर, कानपूर व मुंबई व येथून रंग शहरात आले आहेत. शहरात रंगांचे २ ते ३ होलसेल विक्रेते आहेत. ५० ग्रॅमसाठी २५ ते ३० रूपये या प्रमाणे रंगांची विक्री होते. तर कानपूर येथील रंग ४० रुपये तोळा या दराने विकला जात आहे. पर्यावरणपूरक रंगाची १० ग्रॅमची डबी १० रूपयात विक्री होत आहे. रंगाचे दर जरी वाढले असले तरी रंगाच्या खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे.