लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात गुंडांनी केलेल्या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात सर्वसामान्य जनता आणि पोलीसदेखील सुरक्षित नाहीत, असे ट्वीट करून आपला संताप व्यक्त केला आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आरोपीला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. उत्तर प्रदेशातील कायदा आण आणु सुव्यवस्था खालावली आहे. गुन्हेगारांची भीती संपली आहे. सर्वसामान्य जनता आणि पोलीसदेखील सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. इतक्या गंभीर घटनेनंतर त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये अजिबात हलगर्जीपणा नको, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी बिकरु गावात गेली असता ही चकमक उडाली. त्यात पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.