योगीचा असाही उद्दाम योग ! ; म्हणे , ऑक्सिजनच्या टंचाईचा गाजावाजा केल्यास रुग्णालयावर कारवाई !

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ऑक्सिजनचा तुटवडा असला तरी  गाजावाजा करु नका. प्रसारमाध्यमांसमोर गाजावाजा केल्यास तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा उत्तरप्रदेशातील  योगी सरकारने रुग्णालयांना दिला आहे.

 

देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अनेक रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी होत आहे. त्यातच ऑक्सिजन कमी पडल्यास रुग्णालयांकडून राज्यांना आणि संबंधित यंत्रणांना माहिती दिली जात आहे. असं असतानाच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मात्र ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात इशारा देणाऱ्या रुग्णालयांना तंबी दिली आहे.

 

रविवारी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानिरीक्षक यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असणाऱ्या ज्या रुग्णालयांमधून रुग्णांना सोडून दिलं जात आहे किंवा ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडे तक्रार केली जातेय त्यांच्यावर कावाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिलीय. “आमच्याकडे ऑक्सिजन नाही अशी नोटीस लावणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई केली पाहिजे आणि रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं पाहिजे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे मुद्दाम रुग्णालयांकडून गोंधळ निर्माण करणारी, रुग्णांना घाबरवून टाकणारी परिस्थिती निर्माण केली जातेय का याची चौकशी केली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले,” अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

 

“मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता नसल्याचं बैठकीमध्ये सांगितलं. प्रत्येक खासगी आणि सरकारी रुग्णलयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात राज्य सरकार काम करत आहे, मात्र ऑक्सिजनचा गैरवापर थांबवला पाहिजे,” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र एकीकडे ऑक्सिजनची समस्या नसल्याचं सांगताना दुसरीकडे त्यासंदर्भातील आदेश देत एकापद्धतीने योगी यांनी ऑक्सिजन समस्येसंदर्भात अप्रत्यक्षपणे चिंता व्यक्त केल्याचं काही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. “१०० किंवा त्याहून अधिक बेड्स असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लॅण्ट असेल असं बघावं. मुख्य सचिवांना यासंदर्भातील प्रस्ताव पाठवा,” असे आदेश योगींनी अधिकाऱ्यांना दिल्याचं या बैठकीतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

काही दिवसांपासून लखनऊबरोबरच राज्यातील इतर शहरांमधील रुग्णालयांनी ऑक्सिजन तुटवड्याची तक्रार केली असून रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना इतर ठिकाणी हलवावे असं म्हटलं होतं. लखनऊमधील एका खासगी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आदित्यनाथ यांनी स्वत: येऊन रुग्णालयांची परिस्थिती पहावी असं म्हटलं आहे. “त्यांनी प्रत्येक रुग्णालयाला भेट देऊन तेथील ऑक्सिजन पुरवठ्याचं ऑडिट करावं. त्यानंतर आपण रुग्णलयांना आणि लोकांना अशा परिस्थितीत सोडल्याबद्दल त्यांचंच त्यांना वाईट वाटेल,” असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये जागा कमी पडत आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीच वाटत नाही. त्यांना फक्त रुग्णलयांनी त्यांचा अजेंडा राबून खरी माहिती लपवून ठेवण्यात रस आहे,” असंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

 

लखीमपुर खेरी, फिरोजाबाद, बरेली, मेरठ जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमधील डॉक्टरांनी सोमवारपासून स्थानिक पत्रकारांना ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातील माहिती देण्यास सुरुवात केलीय. आनंद रुग्णालयातील डॉक्टर संजय जैन यांनी, “आम्ही आमच्या रुग्णालयातील २० रुग्णांना आर्यव्रत रुग्णालयात हलवलं कारण आमच्याकडे ऑक्सिजनचा तुटवडा होता. आम्हाला दिवसाला ३०० ते ४०० सिलेंडर्स लागतात पण १५० सिलेंडर्सच पुरवले जात आहेत,” अशी माहिती दिली. अशाच तक्रारी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील इतर रुग्णालयांमधील डॉक्टरांनाही केल्यात

Protected Content