येस बँकेवर निर्बंध : शेअर बाजारात एका मिनिटात ४ लाख कोटी बुडाले !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचे थैमान आणि येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंधामुळे आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १००० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा ३५० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. निफ्टी ११ हजारपेक्षा खाली आहे.

 

येस बँकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने आरबीआयकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बँकांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसत नाहीय. येस बँकेच्या शेअरमध्ये २५ टक्के तर एसबीआयच्या शेअरमध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली आहे. यस बँकेच्या खातेदारांना महिन्याभरासाठी ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. जवळपास ८० देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. याचा परिणाम जगातल्या महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये दिसू लागला आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सकाळच्या सुमारास मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात उलाढाल सुरू होताच सेन्सेक्स ८५६.६५ अंकांनी घसरला. पुढे सेन्सेक्स १,४५० अंकांनी खाली गेला. तर निफ्टीमध्ये ३ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.

Protected Content