चोपडा प्रतिनिधी । चोपडा महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामानाने युवतीसभेंतर्गत एक दिवशीय व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील ५५ विद्यार्थीनिनी सहभाग नोंदवला. उद्घाटन प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेचे वक्ते वसुंधरा लांडगे (अमळनेर), आशाताई गाजरे(अकुलखेडा), दिगंबर कट्यारे (जळगाव) व राधेशाम पाटील (चोपडा) हे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, डॉ.के.एन. सोनावणे, प्रा.एन.एस.कोल्हे, प्रा.एम.टी. शिंदे, प्रा.व्ही.वाय. पाटील, प्रा.एस.बी. पाटील, डॉ.अयुब पिंजारी, शाहीन पठाण उपस्थित होते. सुरुवातीला अश्विनी सैंदाणे या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै शरश्चंद्रीका पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन झाले.
कार्यशाळेची प्रस्तावना डॉ.पी.एम.रावतोळे यांनी केली ज्यात त्यांनी नमूद केले की, शिक्षण घेत असतांना विद्यार्थीनीना अभ्यासोत्तर उपक्रमात मोकळेपणाने सहभागी होता यावे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे व आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सूत्रसंचलन प्रियांका धनगर यांनी केले, वक्त्यांचा परिचय प्रा. क्रांती क्षीरसागर व प्रा. सुनिता पाटील यांनी केला व आभार प्रा.एस.एन. पाटील यांनी मानले. स्नेहा राजपूत यांनी कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींची नोंदणी केली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात वसुंधरा लांडगे यांनी “कर्तुत्ववान स्त्रियांचा ऐतिहासिक वारसा” या विषयावर मार्गदर्शन केले. वसुंधराताईंनी स्त्री व समाजव्यवस्था यावर प्रकाश टाकला. ज्यात प्रकर्षाने शरश्र्चंद्रिका आक्का, जिजामाता, झाशीची राणी अशा विविधकर्तबगार स्त्रीयांचे उदाहरणे देऊन आपण कोणता आदर्श स्विकारावा, तसेच समाज रचना परिवर्तनाच्या वाटेवर आणण्यासाठी दृष्टी नाही तर दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे असे सांगितले.शेवटी त्यांनी आपल्या सुस्वरात, तालात स्वरचीत “स्रीशक्तीचा जागर” हा पोवाडा सादर करुन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त आशाताई गाजरे यांनी युवतींचे आरोग्य याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले व घरगुती उपचारातून आरोग्य कसे सांभाळावे हे सांगितले. बेटी बचाव बेटी पढाव ह्या विषयी त्या कोणते उपक्रम राबवतात ते सांगितले. स्रीयांच्या आरोग्याविषयी बोलतांना रक्तचाचणी, औषधे तसेच सशक्तपणासाठी व्यायाम, कराटे यासारख्या अनेक गोष्टी किती महत्वाच्या आहेत ते स्वानुभवातून कथन केले. त्यांनी स्वत: एक कुपोषित मुलगी दत्तक घेऊन आदिवासी भागात कुपोषित बालकांसाठी काम करण्याचा आदर्श समजा समोर ठेवला आहे.
तर द्वितीय सत्रात दिगंबर कट्यारे यांनी “अंधश्रद्धा निर्मुलन व समुपदेशन” या विषयावर मार्गदर्शन केले त्यात त्यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट करुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व्यापक कार्याची माहिती दिली. वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर जास्त भर देवून विविध चमत्कार सादर केले. त्यात गडुतून पाणी काढणे, पाण्याचा दिवा पेटवणे, जळका कापुर खाणे,कौल लावणे इत्यादी चमत्कार करुन दाखविले व हे सगळे खऱ्या अर्थाने चमत्कार नसून त्यामागे कार्यकारण भाव असतो हे स्पष्ट केले. त्यानंतर राधेश्याम पाटील यांनी “व्यक्तीमत्व विकास व नेतृत्व गुण” या विषयावर आपले मनोगत मांडताना सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची व शास्रज्ञांची उदाहरणे देऊन व्यक्तीमत्व विकास कसा होतो ते सांगितले. त्यांनी शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकरांचा आदर्श सर्वांसमोर मांडला. भाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास यासाठी काय करावे हे उदाहरण दाखल सांगितले. प्रयत्नाची जोड असेल व इच्छा शक्ती असेल तर हे सहज श्यक्य होईल हे पटवून दिले. त्यानंतर पायल राजेंद्र भोसले व प्राजक्ता वानखेडे या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की, कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्ट होते व वक्त्यांचे मार्गदर्शन खूप प्रभावी होते व भावी आयुष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल असे सांगितले. समारोपप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ.ए.एल.चौधरी यांनी व्यक्तीमत्व विकास होण्यासाठी महिला सबलीकरण हा विषय अधिक महत्वाचा आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हि काळाची गरज आहे. या कार्यशाळेत वक्त्यांनी जे मार्गदर्शन केले ते जणू कार्यशाळेत सहभागी झालेल्या युवतींसाठी एक पर्वणीच होती, असे विधान त्याठिकाणी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.व्ही.पी.हौसे, महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थी तसेच हनुमंत पाटील व निलेश भाट यांनी सहकार्य केले.