युपीमध्ये शुटींग करून कुणाला डाकू बनायचे आहे का ? : गुलाबराव पाटील

 

मुंबई : प्रतिनिधी । योगी आदित्यनाथ यांचा बॉलिवुडला युपीत हलविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. युपीत शुटींग करून कुणाला डाकू बनायचे आहे का ? अशा शब्दात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी योगींची खिल्ली उडविली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील बॉलीवूड उत्तर प्रदेशला घेऊन जाण्यास संदर्भात केलेल्या विधानावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, उत्तर प्रदेश हा सर्वात असुरक्षित राज्य आहे. दिवसाढवळ्या बँकांमध्ये दरोडे टाकले जातात. त्या राज्यात कुठलीही सुरक्षितता नाही. त्यामुळे मुंबई ही सुरक्षीत आहे. त्यामुळे कोणीही उत्तरप्रदेशात मुंबईतील उद्योग-धंदे नेऊ शकत नाही. त्यामुळे योगी यांच्याकडून जो प्रकार सुरू आहे त्याचे फलित काय आहे? असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

उत्तर प्रदेशातील बँकांमध्ये रोज होणारे दरोडे आणि लूटमार कोण करत आहेत, त्या दरोडेखोरांच्या नावांची यादी जरी बॉलीवूडच्या लोकांनी पाहिली तर उत्तर प्रदेशात कोणीही चित्रिकरणासाठी जाणार नाही. गेले तर तेथे जाऊन त्यांना काय डाकू बनायचे आहे का, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

मुंबईला कुणीही तोडू शकत नाही. मुंबईची नाळ अनेक क्षेत्राशी खुप घट्ट जुळलेली आहे. म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि ती ओळख यापुढेही कायम राहणार आहे. मुंबईची ओळख पुसण्याचे काम कोणी करत असेल तर ते अपयशी ठरतील आणि मुंबईकर ते खपवून घेणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

Protected Content