नवी दिल्ली : वृत्तसंस्था । संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे ते सोनिया गांधी यांची जागा घेऊ शकतात.
युपीएच्या अध्यक्ष पदाची धुरा आजवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आहे. सोनिया गांधी या अलीकडच्या काळात आजारी राहत असल्यामुळे त्या तशा सक्रीय राजकारणापासून दूरच आहेत. या पार्श्वभूमीवर यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात यशस्वीपणे मोट बांधल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महा विकास आघाडीला यश लाभल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला थोपवून धरण्यासाठी विरोधक एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना यूपीएच्या चेअरमनपदाची धुरा मिळू शकते. शरद पवार यांना प्रदीर्घ अनुभव असून ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांना एकत्र करू शकतात. यामुळे त्यांच्याकडे यूपीएची धुरा येण्याचे संकेत आता मिळाले आहेत.