न्युयॉर्क-महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनोच्या) मुख्य कार्यालय परिसरामध्ये उभारण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. आज न्युयॉर्क मधील युनो कार्यालयाला ना.रामदास आठवले यांनी भेट दिली.
त्यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. सीमा आठवले व पुत्र जीत आठवले उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्र संघ मुख्यालय परिसरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी आपण भारत सरकार तर्फे प्रयत्न करू असे ना.रामदास आठवले यांनी न्यूयॉर्क मधून कळविले आहे.
युनो हे जगभरातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय संघटन आहे. संयुक्त राष्ट्र संघ (युनायटेड नेशन) यामध्ये जगभरातील 193 देश सदस्य आहेत. अमेरिकेतील न्युयॉर्क मध्ये युनोचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयातील सभागृहात युनोची बैठक होत असते. आणि या सभेला जगभरातील 193 देशाचे राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री युनोच्या या कार्यालयात उपस्थित राहत असतात. या सभागृहाला आज ना. रामदास आठवले यांनी भेट दिली आणि पाहणी केली. या परिसरातील नेल्सन मंडेला यांचा पुतळा आणि महात्मा गांधी यांच्या पुतळयाची पाहणी करुन ना. रामदास आठवले यांनी त्यांना अभिवादन केले.
या परिसरामध्ये नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधीचा पुतळा आहे.त्याप्रमाणे जागतिक किर्तीचे दिगविजयी नेते, लोकशाहीचे प्रणेते महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा न्युयॉर्क मधील (युनोच्या) मुख्य कार्यालयात उभारण्यात आला पाहिजे अशी आग्रहाची मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे. अमेरिकेतील आंबेडकरी जनतेच्याही मनात ही भावना आहे. हा पुतळा उभारण्यात आला तर जगभरातील आंबेडकरी अनुयायांना आनंदाची बाब निर्माण होईल. त्यामुळे आपण भारत सरकारच्या माध्यमातुन युनायटेड नेशनमध्ये डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याबाबत प्रयत्न करणार आहोत असे ना. रामदास आठवले यांनी न्युयॉर्कमधुन कळविले आहे.