जळगाव प्रतिनिधी । मेहरूणमधील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या चाचणीचा रिपोर्ट आता निगेटीव्ह आला असला तरी नागरिकांनी या पुढे देखील काळजी घ्यावी असे आवाहन महापौर भारतीताई सोनवणे यांनी केले आहे.
जळगाव शहरातील कोरोनाच्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. याबाबत महापौर म्हणाल्या की, जळगावकरांच्या दृष्टीने ही दिलासा देणारी मोठी बाब आहे. कोरोना मुक्तीसाठी लढा देत असलेल्या डॉक्टर्स, परिचारिका, आशा सेविका, पोलीस, सामाजिक संस्था, मलेरिया, आरोग्य विभाग, साफसफाई अधिकारी, कर्मचारी व शासकीय कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे आजवर इतर कुणीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते असे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे, मास्क वापरणे, कान, नाक, डोळ्याला वारंवार हात न लावणे या बाबींचे नागरिकांनी कसोशीने पालन करावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे. तसेच संबंधित कोरोना रुग्णाचा दुसरा रिपोर्ट पंधरा दिवसांनी पुन्हा निगेटिव्ह यावा यासाठी महापौरांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहे.