रावेर, प्रतिनिधी | मागील आठवड्यात रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे जिल्ह्यात खतांचे रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी यांनी रासायनिक खतांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत खतांचे रॅक उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात.
आज जळगाव येथे जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या उपस्थितीत रासायनिक खत कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. रावेर,यावल सह जिल्ह्यात खतांचे रॅक नसल्याने खतांची मागणी वाढली आहे. त्यात या बैठकीत दोन कंपन्यांनी लवकरच रॅक देण्याचे मान्य करून रावेर तालुक्याला जास्तीत जास्त पुरवठा करण्याबाबत कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी सूचना दिल्या. यावेळी बैठकीस माफदा, पुणेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ, रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, जिल्हा मोहीम अधिकारी प्रकाश महाजन यांसह कंपनी प्रतिनिधी के. बी. शेळके, एस. एस. ठवरे, समाधान काळे, सप्तर्षी महाजन, सचिन पाटील, सुनील पवार, प्रकाश जोगदंड आदी उपस्थित होते. मागील आठवड्यात रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे सुनील कोंडे यांनी जळगाव येथे निवेदन देत याबाबत मागणी केली होती.यावेळी रावेर तालुक्यासाठी पोटॅशचा जास्तीत जास्त पुरवठा देण्याबाबत माफदाचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनीही बैठकीत मागणी केल्याने कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी रावेरला जास्त पोटॅश देण्याबाबत सूचना दिल्या.