यावल : साकळी येथे रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात बसून ग्रामस्थांचे आंदोलन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी फाटा ते गावापर्यंतचा मुख्य रस्ता पाण्याखाली आल्याने आज सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे यांच्या नेतृत्वात आज बुधवारी सकाळी ११ वाजता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याजवळ व  पाण्यात बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट घेवून रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

याबाबत माहिती अशी की, साकळी गावापासून ते साकळी फाट्यादरम्यान रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबत असल्याने पाण्याची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यात यावी, हा मुख्य रस्ता पाण्याखाली येत असून मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी तसेच उर्दू शाळेच्या मुलांना देखील हा एकमेव रस्ता असल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे.  यासंदर्भात साकळी येथील सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे यांनी संबधित अधिकारी व प्रशासन यांना निवेदन दिले होते. मात्र तरी सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर आज बुधवारी सकाळी ११ वाजता साकळी गाव ते साकळी फाट्याच्या मुख्य रस्त्यावरील साचलेले पाणीच्या खड्यात बसून आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनाला उर्दू शाळा शिक्षक, पालक, रिक्षाचालक, मालक व स्थानिक ग्रामस्थांनी पाठींबा दिला.

आंदोलनात यांनी घेतला सहभाग

सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे, विजय जंजाळे, आकाश जंजाळे, उर्दू शाळेचे शिक्षक फैसल खान, रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष अकबर शेख फरीद खान, सैय्यद अजगर सैय्यद अझहर, लाला डायव्हर, अंजुम शेख, पिंटू तडवी, अरुण भोई, न्याजोद्दिन तडवी यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

सा.बां. विभागाचे आश्वासन

सार्वजनिक बांधकाम विभाग यावल चे अधिकारी अजीत निंबाळकर यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन आंदोलन कर्त्यांच्या अडचणी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्याच्या बाजुस असलेल्या अपुर्ण गटारींच्या कामाबाबत लक्ष देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. ग्रामपंचायत प्रशासनास तात्काळ अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा देऊन अतिक्रमण काढावे, जेणे करून पाणी साचणार नाही, असे आदेश दिले. खड्यावर मुरूम टाकून सध्यास्थितीत रस्ता दुरूस्त करून व येणाऱ्या काळात निधी वापरून कायमस्वरूपी रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. आश्वासनानंतर आंदोलनकर्ते तथा सामाजीक कार्यकर्ते मिलींद जंजाळे यांनी दोन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Protected Content